मंगळवारी १०३ पीओपी मूर्ती जप्त *एक लाख ४० हजार रुपये दंड वसूल ; मनपाच्या कारवाईला गती* नागपूर, ता. १२ : पीओपी मूर्ती विरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला असून शहरात धडक कारवाईला गती दिली आहे. मंगळवारी (ता.१२) विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये १०३ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व या कारवाईमध्ये १ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडीकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित पीओपी मूर्तीच्या विक्रीवर आळा बसावा यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेने मूर्ती विक्री स्थळांची तपासणी मोहिम सुरू केली आहे. मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे जवान, पारंपरिक मूर्तिकार संघाचे प्रतिनिधी व पोलिस विभाग यांच्याद्वारे संयुक्तरित्या मूर्ती तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. पारंपरिक मूर्तिकार संघाच्या प्रतिनिधींकडून मूर्तीची तपास...