मनपा आयुक्तांनी विद्यार्थ्यांना सांगितली यशाची चतु:सूत्री
‘सुपर-७५’च्या पहिल्या बॅचचा शुभारंभ : मनपाच्या विद्यार्थ्यांना खासगी कोचिंग क्लासेसकडून नि:शुल्क प्रशिक्षण
नागपूर, ता. ७ : ‘प्लॅनिंग’, ‘प्रिपरेशन’, ‘प्रॅक्टिस’ आणि ‘परफॉर्मन्स’ या चार ‘पी’ म्हणजेच यशाची चतु:सूत्री आहे. याचा अवलंब करा, न घाबरता, डोकं शांत ठेवून परीक्षेला सामोरे जा, नक्की यश मिळेल, असा यशाचा मूलमंत्र मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
नागपूर महानगरपालिकेचा माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला महत्वाकांक्षी प्रकल्प ‘सुपर-७५’मधील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या कोचिंग क्लासेसमधील प्रशिक्षण वर्गाचा गुरूवारी (ता.७) बजेरिया येथील मनपाच्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररी येथे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी महापौर महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत शुभारंभ झाला. यावेळी एसीआय नागपूरचे अध्यक्ष श्री. रजनिकांत बोंदरे, सचिव तथा ‘सुपर-७५’चे प्रकल्प व्यवस्थापक श्री. महेश अंधारे, मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ‘सुपर-७५’या संकल्पनेचे कौतुक करीत नागपूर महानगरपालिकेमध्ये संकल्पना राबवून ती यशस्वीरित्या अंमलात आणण्यासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांचे अभिनंदन केले व आभार मानले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मनपा आयुक्त म्हणाले, ११वी आणि १२वी हे आयुष्याच्या पुढील करिअरला दिशा देणारे महत्वाचे वर्ष आहेत. या दोन वर्षातील मेहनत ही आपली करिअरची पुढील वाट निश्चित करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेहनतीसोबतच आत्मविश्वासाने ही वाट सुकर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या. ‘सुपर-७५’हा मनपाचा अत्यंत स्तूत्य उपक्रम आहे. तो पुढे सुरू राहणारच पण यासोबतच त्यात अनेक पैलूंनी विकास व्हावा यादृष्टीने मनपाचा प्रयत्न असेल. सर्व अडीअडचणी सोडवून प्रकल्पाच्या वाढीसाठी मनपा सदैव तत्पर असल्याचाही विश्वास यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला.
*विद्यार्थ्यांनो अडचणी सांगा, वेळीच सोडवू : अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल*
‘सुपर-७५’हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी मार्ग दाखविणारा महत्वाचा प्रकल्प आहे. महानगरपालिकेने सुरू केलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करा. मेहनतीला कोणतेही ‘शॉर्टकट’ नाही. त्यामुळे मेहनत करा, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. आपले पुढचे यश हेच आपली ओळख बनविणार आहे, अशा शब्दांत मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्तांनी विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण आल्यास थेट त्यांनाच संपर्क साधावा अशा सूचना दिली. ‘सुपर-७५’ बद्दल त्यांनीही माजी महापौर दयाशंकर तिवारी यांचे अभिनंदन केले. हा प्रकल्प आणखी वाढावा त्याचे स्वरूप विस्तारीत व्हावे यासाठी आवश्यक ते सर्व कार्य करू सोबत आता सुरू असलेल्या सर्व बॅचेसला आवश्यक त्या सर्व सुविधा वेळीच मिळाव्यात यासाठी स्वत: लक्ष देउ, असेही त्या म्हणाल्या. मनपाच्या नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेमध्ये सुरू असलेल्या ‘सुपर-७५’च्या दुस-या व तिस-या बॅचची पूर्ण जबाबदारी घेउन वेळोवेळी विद्यार्थी आणि संबंधित कोचिंग इन्स्टिट्यूटशी देखील संवाद साधणार असल्याचे श्रीमती आंचल गोयल म्हणाल्या.
*लक्ष्य प्राप्त करून ‘पौर जन हिताय’ साध्य करा : दयाशंकर तिवारी*
नागपूर महानगरपालिकेचे ब्रिदवाक्य ‘पौर जन हिताय’ हे आहे. जनतेसाठी कार्य करून त्यांना सुविधा देण्याचे मनपाचे कार्य आहे. प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या ध्येयाच्या पूर्तीमध्ये त्यांची आर्थिक स्थिती अडसर ठरू नये या उद्देशाने ‘सुपर-७५’ ची संकल्पना पुढे आली. कोव्हिड काळामध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाने विद्यार्थ्यांना आपले ध्येय पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने करा, आपले निर्धारित लक्ष्य पूर्ण करून मनपाचे ब्रिदवाक्य ‘पौर जन हिताय’चा अर्थ आणि उद्देश ख-या अर्थाने साध्य करा, असा मौलीक संदेश माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
‘सुपर-७५’ च्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत टॅब, तसेच आवश्यक सर्व शैक्षणिक साहित्य प्रदान करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘सुपर-७५’मध्ये विज्ञान विषयासोबतच वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सुविधा मिळण्याबाबत प्रयत्न करण्याची मागणी यावेळी त्यांनी आयुक्तांना केली. आयुक्तांनी यासंबंधी अडचणी दूर करून लवकरच वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचाही समावेश करण्याची ग्वाही दिली.
प्रास्ताविकामध्ये शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी ‘सुपर-७५’ प्रकल्पाची माहिती दिली. ‘सुपर-७५’ अंतर्गत मनपाच्या शाळांमधील ७५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना ‘नीट’, ‘जेईई’ आणि ‘एनडीए’चे नि:शुल्क कोचिंग दिले जाते. या कार्यात मनपाला शहराला खासगी कोचिंग क्लासेसचे सहकार्य लाभले आहे. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना १०वी पर्यंत मनपाच्या सीताबर्डी येथील नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेत खासगी कोचिंग क्लासेसमार्फत कोचिंग दिले जाते. यानंतर ११वी व १२वी मध्ये त्यांना खासगी कोचिंग क्लासेसमध्ये संबंधित अभ्यासक्रमाचे कोचिंग देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
*कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींचा सन्मान*
‘सुपर-७५’ प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना नि:शुल्क कोचिंग देणा-या शहरातील विविध कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते मनपाचा मानाचा दुपट्टा, सन्मानचिन्ह आणि तुळशी रोप देउन सन्मान करण्यात आला. एसीआय नागपूरचे अध्यक्ष श्री. रजनिकांत बोंदरे, सचिव तथा ‘सुपर-७५’चे प्रकल्प व्यवस्थापक श्री. महेश अंधारे, स्नेहा कोचिंग क्लासेसचे श्री. श्याम शेंदरे, इनसाईट कॅम्पसचे श्री. सुरज अय्यर, एसीआयचे सचिव व मिटकरी ॲकेडमीचे संचालक श्री. विराग मिटकरी, पिरॅमिड ट्यूटोरियलचे संचालक श्री. जयंत गणवीर, तवानी ट्यूटोरियलचे संचालक सर्वश्री डॉ. मनोज तवानी, डॉ. आशिष तवानी, प्रा.एस.एन.खान, डीडीएस ॲकेडमीचे संचालक श्री. एस.एल. दंदे, स्नेहा कोचिंग क्लासेसचे श्री. श्याम शेंदरे आदींनी मनपातर्फे सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन शिक्षण विभागाचे श्री. प्रशांत टेंभुर्णे यांनी केले व शेवटी आभारही मानले.