पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त बैठकीत प्रशासनाची ग्वाही
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे मनपा, पोलीस विभाग, जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नागपूर, ता. ६ : श्री गणेश उत्सव 2023 हा पर्यावरणपूरक साजरा करण्याकरिता नागपूर महानगरपालिका, नागपूर पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाची प्रशासकीय यंत्रणा संपूर्णतः सज्ज आहे, अशी ग्वाही प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळ व स्वयंसेवी संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नागपूर शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता. ६) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पोलीस सहआयुक्त श्रीमती अश्वती दोरजे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन, उपायुक्त श्री. सुरेश बगळे, डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, महेश धामेचा, मिलिंद मेश्राम, क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी श्री. पीयूष आंबुलकर यांच्यास पोलीस दलाचे अधिकारी, जिल्हा प्रशासकाचे अधिकारी व मनपाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांना शासनकडून पुरस्काराबाबत माहिती तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या ऑनलाईन नोंदणीबाबत व उत्सव / मिरवणुक शांततेत पार पाडण्याबाबत माहिती व चर्चा करण्यात आली.
*पोलीस विभागाकडून मिळणार त्वरित परवानगी : पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार*
कर्यक्रमात मागदर्शन करतांना नागपूर शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सांगत, नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा याकरिता पोलीस विभागाकडून गणेशोत्सवासाठी लागणारी परवानगी त्वरित देण्यावर भर असणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी मनापाद्वारे तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीकरिता आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती गोयल यांचे अभिनंदन केले. याशिवाय गणेशोत्सव शांततेत पार पडावा याकरिता नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अप्रिय घटना होई नये याची खबरदारी घ्यावी. पोलीस विभागासह प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.
*नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यास मनपा कटिबद्ध : आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी*
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, यंदाचा गणेशोत्सव पूर्णतः पर्यावरणपूरक साजरा व्हावा यावर मनपा प्रशासनाचा भर असणार आहे. नागरिकांच्या सोयी करिता मनपाने ऑनलाईन परवानगी प्रणाली अमलात आणली आहे. गणेशोत्सव मंडळांनी या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून परवानगी प्राप्त करावी, ज्यांना ऑनलाईन मध्ये त्रास होत असेल अशा मंडळांकारिता मनपाच्या सर्व दहाही झोन निहाय एक खिडकी व्यवस्था करण्यात आली असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले. याशिवाय नागरिकांनी अधिकाधिक भर पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या स्थापनेवर द्यावा. असे आवाहन डॉ. चौधरी यांनी यावेळी केले.
*मंडळांकारिता उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२३ स्पर्धा : जिल्हाधिकारी डॉ. इटनकर*
*गणेश मंडप नोंदणीच्या ऑनलाईन सुविधेला सुरुवात : अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल*
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून गणेश मंडप नोंदणीच्या ऑनलाईन सुविधेला सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना मनपा, पोलिस, वाहतूक, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग आदींची परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागतात. या प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये अनेकदा फे-या देखील माराव्या लागतात. या सर्वांवर उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेद्वारे घरबसल्या सर्व विभागांची परवानगी घेता यावी अशी ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन प्रणालीवर आवश्यक माहिती, कागदपत्रे अपलोड करून घरबसल्या परवानगी घेता येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा उपायुक्त श्री. सुरेश बगळे यांनी केले. संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले व शेवटी त्यांनी आभारही मानले.
*अशी करा नोंदणी*
ऑनलाईन गणेश मंडळ नोंदणी करण्यासाठी मनपाच्या
https://nmcnagpur.gov.in/RTS/ws/user/login.do
या संकेतस्थळावर जा ‘रजिस्टर’वर क्लिक करून नाव, आडनाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक टाका व सेंड ओटीपी वर क्लिक करा. ओटीपी नोंदवून रजिस्टरवर क्लिक करा.
नोंदणी झाल्यानंतर साईन इन मध्ये पुन्हा मोबाईल क्रमांक नोंदवा ओटीपी प्राप्त करून तो नोंदवा.
मनपाच्या संकेतस्थळाचे डॅशबोर्ड ओपन होईल. यात ‘गणेश मंडळ परवानगी’ वर क्लिक करा. परवानगी मिळविण्याची पद्धती अटी व शर्ती वाचून ‘ॲग्री’वर क्लिक करा. गणेश मंडप परवानगी चा अर्ज ओपन होईल. यात आवश्यक ती सर्व माहिती भरा.
गणेश मंडळाच्या मंडप स्थळाचा सविस्तर माहिती दर्शविणारा नकाशा अपलोड करा. यानंतर हमीपत्र, पोलिस परवानगीकरिता खासगी जागेबाबत प्रमाणपत्र, वस्तीतील नागरिकांचे ना हरकत प्रमाणपत्र, गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्यांचे हमीपत्र, मंडळातर्फे संरक्षणाकरिता नेमलेल्या स्वयंसेवक, सुरक्षा रक्षकांची यादी व संमतीपत्र, मंडळ पदाधिका-यांच्या नावाची यादी हे सर्व डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा, त्यात आवश्यक सर्व माहिती भरून स्वाक्षरी करा. यानंतर भरलेले हमीपत्र व इतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून ते संकेतस्थळावर अपलोड करा. आवश्यक शुल्क भरा व व्हिव अँड प्रिंट वर क्लिक करून प्रिंट काढा आणि सबमिटवर क्लिक करा. यानंतर आपल्याला नोंदणी क्रमांक प्राप्त होईल.
आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी डॅशबोर्डवर अर्जाची स्थिती तपासा यावर क्लिक करा. नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून अर्जाची सद्यस्थिती पहा.