नागपूर :यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिका आग्रही आहे. पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून, सोमवार (ता. ११) रोजी बजेरिया चौक येथील शाहू मूर्ती भंडार यांच्यावर कारवाई करीत ११७ पीओपो मूर्ती जप्त करण्यात आल्या व मूर्ती विक्रेत्यांकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेने पी.ओ.पी. मूर्तींवर बंदीच्या संदर्भात केन्द्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार पीओपी मूर्तींच्या विक्री संदर्भात कारवाई केल्या जात आहे.
मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांना पी.ओ.पी. मूर्तीं विक्री संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सोमवार (ता. ११) रोजी बजेरिया चौक येथील प्रशांत शाहू यांच्या मालकीच्या शाहू मूर्ती भंडार यांच्यावर धडक कारवाई करण्यात आली. स्वच्छता विभागाचे विभागीय अधिकारी श्री. रोहिदास राठोड, गांधीबाग झोनचे श्री. सुरेश खरे, श्री नवकिसन शेंडे, श्री. लोकेश बासलवार, उपद्रव शोध पथक सिव्हीलचे श्री. संजय खंडारे, गणेशपेठ पोलीसे ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. महेद्र आंभोरे यांच्या चमूने ही धडक कारवाई केली.या वेळी पारंपारिक मुर्तिकार श्री सुरेश पाठक व श्री चंदन प्रजापती प्रामुख्याने उपस्थित होते. दुपारी सुरू झालेली कारवाई जवळपास चार तास चालली. यादरम्यान येथील मूर्तींची तपासणी करण्यात आली व पीओपोच्या ११७ मूर्ती जप्त करण्यात आल्या व मूर्ती विक्रेत्यांकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.