जिल्हा प्रशासनाच्या सर्तकतेमुळे रोखला बाल विवाह
✒️प्रविण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
वर्धा, दि.1 : वर्धा तालुक्यातील बोरगाव मेघे 16 वर्षीय मुलीचा 28 वर्षीय युवकाबरोबर विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 क्रमांकावर प्राप्त झाली होती. या माहितीवरुन तत्काळ प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन, पोलिस व प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने बाल विवाह थांबविण्यात आला.
बोरगाव मेघे येथे दि.29 नोव्हेंबर रोजी बाल विवाह होत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्पलाईनवर प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते यांच्या आदेशानुसार बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अल्पवयीन मुलीचा बाल विवाह होत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, तहसिलदार रमेश कोळपे, गटविकास अधिकारी श्री. पाटील, वर्धा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक धनाजी जळक यांना कळविण्यात आली.
कारवाई दरम्यान मुलीचे आई वडील व उपस्थित नातेवाईकांना मुलीचा विवाह 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्यात यावा तसे न केल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार कार्यवाहीस पात्र राहील, याची जाणीव करुन देण्यात आली. सदर मुलगी 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर विवाह करणार असा बाल विवाह कायद्यांतर्गत कुंटूंबाकडून जबाबनामा लिहून घेण्यात आला. तसेच सदर मुलीला बाल कल्याण समिती समोर हजर राहण्यास सांगण्यात आले, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.