गरीब रुग्णांची सेवा परमेश्वराच्या भक्तीप्रमाणे : केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी / इंडियन फूट अँड अँकल सोसायटीच्या कॉन्फरन्सचे उद्घाटन
गरीब रुग्णांची सेवा परमेश्वराच्या भक्तीप्रमाणे
केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : इंडियन फूट अँड अँकल सोसायटीच्या कॉन्फरन्सचे उद्घाटन
नागपूर - समाजात डॉक्टरला देव मानले जाते. पण माझ्यादृष्टीने डॉक्टरांनी गरीब रुग्णांची सेवा करणे परमेश्वराची भक्तीच आहे, असे प्रतिपादन करीत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी समाजातील शेवटचा माणूस कायम लक्षात ठेवा, असे आवाहन डॉक्टरांना केले.
हॉटेल लि-मेरिडियन मध्ये आयोजित इंडियन फूट अँड अँकल सोसायटीच्या कॉन्फरन्सचे उद्घाटन ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘खूप पैसा मिळाला, आपल्या गरजा पूर्ण झाल्या की आपण समाजाकडे बघितले पाहिजे. सामाजिक संवेदनशीलता आवश्यक आहे. डॉक्टर जेव्हा गरीब रुग्णाची सेवा करतात तेव्हा मी त्याकडे परमेश्वराच्या भक्तीप्रमाणे बघतो. ‘जे कां रंजले गांजले । त्यासि ह्मणे जो आपुले… तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा’ या तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळींमध्ये त्याचा सार दडलेला आहे.’ ज्ञानाचे महत्त्व विषद करताना ते म्हणाले, ‘वैद्यकीय असो वा कृषी क्षेत्र असो ज्ञान सर्वांत महत्त्वाचे आहे. भविष्याचा वेध घेणारे तंत्रज्ञान, भविष्याचा वेध घेणारी दृष्टी समाजात आणि सरकारमध्ये असेल तरच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येते. आणि जगाच्या पाठीवर भारताची प्रगती ज्ञान आणि अनुभवाच्याच जोरावर होत आहे.’ अमेरिकेत, इंग्लंडमध्ये दहापैकी पाच डॉक्टर भारतातील आहेत आणि त्यांना प्रतिष्ठा आहे, याचा अभिमान वाटत असल्याचेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
संधी शोधणारे लोक हवे
भारतात खूप लोकांमध्ये क्षमता आहे. पण काही लोक संधीमध्ये समस्या शोधतात, तर काही समस्यांमध्ये संधी शोधतात. आपल्याला असंख्य अडचणींमध्ये संधी शोधणारे लोक हवे आहेत. त्यांच्याच जोरावर भारत पुढेही प्रगती करणार आहे. विशेषत्वाने डॉक्टरांचे ज्ञान आणि अनुभव देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देणारे आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.