उत्तम शिक्षणातून मिळेल प्रगतीची दिशा -केद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : चर्मकार सेवा संघातर्फे गुणवंतांचा सत्कार
नागपूर - उत्तम शिक्षण हा विकासाचा पाया आहे. चर्मकार समाजाला विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मुलांना चांगले शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. गुणवंतांच्या सत्कारातून त्याची प्रेरणा नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.
चर्मकार सेवा संघाच्या वतीने गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुणवंतांचा सत्कार सोहळा व समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके, संस्थेचे प्रमुख भैय्यासाहेब बिघाणे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी सुरुवातीला श्री संत रविदास यांना अभिवादन केले. ते म्हणाले, ‘ गरिबांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करून त्यांना उजेडाचा मार्ग सापडावा, यासाठी मी श्री संत रविदास यांच्या चरणी प्रार्थना करतो. भैय्यासाहेब बिघाणे यांच्यासारखी मंडळी गेली अनेक वर्षे समाजाच्या परिवर्तनासाठी काम करीत आहेत, याचा मला आनंद आहे. समाजाचा विकास होण्यासाठी समाजात डॉक्टर, वकील, पत्रकार, इंजिनियर, अधिकारी तयार झाले पाहिजेत. त्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. गुणवंतांचा सत्काराचा सोहळा चांगले शिक्षण घेण्याची प्रेरणा नक्कीच देईल.’ यावेळी श्रृती तांडेकर, नेहल पिंपळकर, हिमांशू नवले, देवांश चंदनकर आणि जीवेश मानेकर या विद्यार्थ्यांचा ना. श्री. गडकरी यांनी प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार केला. तसेच भालेगावच्या सरपंच शालिनी चवरे तसेच भाजप पदाधिकारी श्री. अशोक विजयकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
ना. श्री. गडकरी यांच्याकडून प्रोत्साहन
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व समाजातील इतर तरुणांमध्येही शिक्षणाप्रति आस्था निर्माण व्हावी, यासाठी ना. श्री. गडकरी यांच्याकडून ३६५ विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार देण्यात आले. दहावी-बारावीच्या परीक्षेत ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांना १५०० रुपये व ६५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना १००० रुपयांचा रोख पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.