नदी-नाल्यावरील अतिक्रमण तातडीने काढा- चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला सूचना
• प्रशासनाच्या अहवालाने नुकसान होऊ नये
• नागपूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती, नुकसानीचा आढावा
• मृतांच्या कुटुंबीयांना मदतनिधी धनादेशाचे वाटप
नागपूर, दि. 27.09.2023 नागपूर शहरात निर्माण झालेली पूरपरिस्थिती नदी-नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे अधिक विक्राळ झाली. यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये ही दक्षता म्हणून नदी-नाल्यावर कुठेही अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषदेतील प्रतिनिधी तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री बावनकुळे यांनी नागपूर शहरासह जिल्ह्यात पूरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. नागपूर शहरात २३ स्पटेंबर रोजी अतिवृष्टीमुळे ४ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना श्री बानवकुळे यांच्या हस्ते मदतनिधी धनादेश सुपुर्द करण्यात आले.
श्री बावनकुळे म्हणाले, पूरबाधितांना मदत मिळावी यासाठी प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण अहवाल शासनाकडे सादर करावा. कोणतीही व्यक्ती किंवा कुटुंब सर्वेक्षणातून सुटू नये याची काळजी घ्यावी. तलाठ्यांना त्याबाबतचे निर्देश द्यावे. पूरबाधितांना प्रधानमंत्री मदत निधीमधून भरपाई मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करावा, ग्रामीण भागात पिकांच्या नुकसानीचे कृषी विभागाने पंचनामे तयार करून विमा कंपन्यांना मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत अशाही सूचना यावेळी त्यांनी केल्या. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व आमदारांना त्यांच्या समस्या मांडल्या व त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.
या आढावा बैठकीला आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, समीर मेघे, आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह अधिकारी व प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
• मदतीसाठी सरकारकडे मंत्र्यांना विनंती
नदी नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी तसेच शहरातील व ग्रामीण भागातील पूरबाधितांना तातडीने मदत मिळावी यासाठी श्री बावनकुळे यांनी बैठकीतूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना फोनवरून विनंती करून पुढील आठवड्यात नागपूर जिल्ह्याचा दौरा करावा अशी विनंती केली, त्यांनीही विनंती मान्य करून लवकरच नागपूरचा दौरा नियोजित करणार असल्याचा शब्द दिला.
• असे झाले नुकसान
पुरामुळे नागपूर शहरातील १५ हजार कुटुंबे, ११,२३८ घरे, ३०० दुकाने व टपरी बाधित झाली. ५ घरे पूर्णत: क्षतीग्रस्त तर १४९ घरांचे अंशत: नुकसान झाले. नदी-नाल्यावरील ३ पूल खचले, १०२ ठिकाणी १०,३०१ मीटर नाला भिंत कोसळली. ३७,१९० मीटर रस्त्याचे नुकसान झाले आहे. १४ गुरांचे मृत्यू झाला. सर्वेक्षण करण्यासाठी १४५ कर्मचाऱ्यांच्या एकूण ५० टीम तयार केल्या असून ७४०० घरांचे पंचनामे झाले आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६१४२ हेक्टरमध्ये पीकांचे नुकसान झाले तर ६०० घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी प्रशासनाने दिली.