श्रीमद् महावाक्य प्रवचन सोहळ्याची मुहूर्तमेढ आज
पिपळा (हू.) येथे ४३ दिवसांच्या भव्य सत्संगाचे आयोजन
नागपूर, ता. २३ :
अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषद आयोजित श्रीमद् महावाक्य प्रवचन सोहळ्याचा मुहूर्तमेढ समारंभ आज (ता.२४) प्रमुख आचार्य, संत- महंतांच्या उपस्थितीत होणार आहे. पिपळा - हुडकेश्वर आऊटर रिंग रोड लगतच्या ढवंगाळे नगरात सकाळी १० ला संपन्न होणार असून स्वागत समारंभ व धर्मसभा १० नंतर कार्यक्रम स्थळाजवळच्या क्विन्स सेलिब्रेशन येथे होईल.
उपाध्यकुलाचार्य श्रीबीडकर बाबा (जळगाव), आचार्य श्रीभास्करबाबाजी महानुभाव यांच्या हस्ते मुहूर्तमेढ होईल. कवीश्वरकुलाचार्य श्रीकारंजेकर बाबा (अमरावती) यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या धर्मसभेत सोहळ्याचे प्रवाचक उपाध्यकुलभूषण महंत श्रीन्यायंबासबाबा (मकरधोकडा),आचार्य श्रीपातुरकर बाबा (शहादा) यांच्यासह महानुभावांची काशी असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील कवीश्वरकुलाचार्य श्रीदर्यापूरकरबाबा, आचार्य श्रीपाचराऊतबाबा, आचार्य श्रीगोपीराज नागराजबाबा, आचार्य श्रीपैठणकरबाबा, आचार्य श्रीवायंदेशकरबाबा, आचार्य श्री आंबेकरबाबा (श्रीक्षेत्र जाळीचादेव) आचार्य श्रीमानेकरदादा (श्रीक्षेत्र कनाशी), आचार्य श्री मुधोव्यासबाबा, आचार्य श्री एकोव्यासबाबा, आचार्य श्रीबांधकरबाबा या संत-महंतांसह अनेक सद्भक्तांची उपस्थिती लाभणार आहे. आयोजकांतर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्रीमद् महावाक्य प्रवचनाचा मुख्य सोहळा १९ नोव्हेंबरला सुरू होणार असून ३१ डिसेंबर रोजी समारोप होईल, अशी माहीती अ.भा.महानुभाव विचार चिंतन परिषदेचे सचिव सुरेश वाइंदेशकर यांनी दिली.