सिकलसेल अनुवांशिक आजार ; तपासणी करणे आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
प्रत्येक शाळेत तपासणी, सिकलसेल आजाराबाबत कार्यशाळा
नागपूर, दि. 21 : सिकलसेल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा आजार आहे. आतापासून दहावी बारावीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तपासणी करुन त्यांना आभा कार्ड द्या. विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे योग्य समूपदेशन करण्यासाठी महाविद्यालयीन प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांनी सजग रहावे. सोबतच आभा कार्ड तयार करण्याची पध्दत अवगत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी येथे केले. सिकलसेल तपासणीचे 1 लाख उद्दिष्ट पार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
स्व. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित सिकलसेल कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सिकलसेल तज्ज्ञ तथा थॉलेसिमिया सेलचे अध्यक्ष डॉ. विन्की रुघवाणी, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रविण महिरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र काटोलकर, आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आसिफ इनामदार यावेळी उपस्थित होते.
सिकलसेलग्रस्त वधु व वर यांनी विवाह करु नये. विवाहापश्चात होणारी संतती सिकलग्रस्त होण्याची दाट शक्यता असते. म्हणून विवाहाअगोदरच सिकलसेल तपासणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 5 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणीचे उदिष्टय असून पायलट प्रोजेक्ट म्हणून 1 लाखाचा टप्पा प्रथम पार करावयाचा असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेत प्राचार्यांनी सामाजिक सेवेच्या भावनेतून काम करावे. आभा कार्ड (आयुष्मान हेल्थ कार्ड) सर्व जनतेनी काढावे, असे आवाहन त्यांनी केले. सिकलसेलग्रस्तांसाठी दिव्यांगाच्या सर्व सेवा अनुज्ञेय असून महाविद्यालयांनी त्यांची यादी पाठवावी. त्यांना युडीआयडी कार्ड देण्यात येईल. तसेच त्यांना 4 टक्के दिव्यांग आरक्षण लागू होईल. याचबरोबर 18 वर्षावरील नवमतदारांची नोंदणी नमूना 6 भरुन करावी व मोहिमेस यशस्वी करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालयीन प्राचार्य व मुख्याध्यापकांनी सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करुन त्याबाबत समुपदेशन करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले. या मोहिमेत शिक्षण व आरोग्य विभागाने समन्वयाने काम करावे, असेही त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी सिकलसेल तज्ज्ञ डॉ. विन्की रुघवाणी यांनी सादरीकरणाद्वारे सिकलसेल आजाराची माहिती दिली. त्यापासून होणारे दुष्परिणाम याबाबत विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी केले. तर संचालन व उपस्थितांचे आभार उपशिक्षणाधिकारी सुशिल बन्सोड यांनी मानले.
जिल्हास्तरीय सिकलसेल कार्यशाळेस प्राचार्य, मुख्याध्यापक शिक्षक, गृहपाल, समाजकल्याण व दिव्यांग विभागाचे शिक्षक सहभागी झाले होते.