स्व. अरविंद शहापूरकर यांचे भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान- केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी
स्व. अरविंद शहापूरकर यांचे भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान- केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी दिला आठवणींना उजाळा
नागपूर – भारतीय जनता पक्षाने अत्यंत कठीण काळ बघितला आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे पक्षाला आज चांगले दिवस आले आहेत. स्व. अरविंद शहापूरकर यांनी देखील संघर्षाच्या काळात भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान दिले, असे सांगतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी स्व. शहापूरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
भारतीय जनता पार्टी नागपूरच्या वतीने बीआरए मुंडले सभागृहात ज्येष्ठ भाजप नेते स्व. अरविंद शहापूरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर सहसंघचालक श्री. श्रीधर घाडगे, ज्येष्ठ प्रचारक श्री. रवीजी भुसारी, माजी आमदार श्री. चैनसुख संचेती, श्रीमती मिरा शहापूरकर, आमदार श्री. रणधीर सावरकर, श्री. जगदीश गुप्ता, भाजप संघटन मंत्री श्री. उपेंद्र कोठेकर, भाजप शहराध्यक्ष श्री. बंटी कुकडे, माजी आमदार श्री. सुधाकर कोहळे, माजी नगरसेवक श्री. संजय बंगाले यांची उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘अरविंदजींनी पक्षाचे काम सुरू केले तेव्हा पक्ष वाईट स्थितीत होता. त्यांनी संघटनात्मक कार्य करताना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोडले. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात उभे राहिले. त्यांना सांभाळून घेतले. ते प्रत्येकाचे शांतपणे ऐकून घेत. अरविंदजींच्या कृतीमधून आणि वागणुकीतून शुद्ध सात्विक प्रेम झळकायचे.’ अरविंदजींनी शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासाठी काम केले, असेही ते म्हणाले. ‘अरविंदजींनी आयुष्यभर विचारांशी कटिबद्धता ठेवली. संघटनेचे हित लक्षात ठेवून त्यांनी प्रत्येक निर्णय घेतला. आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी पक्ष आणि देशासाठी समर्पित केला. विदर्भात पक्ष वाढविण्याच्या प्रक्रियेत अरविंदजींचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे,’ याचाही ना. श्री. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सातत्याने प्रवास करणे आणि जनसंपर्क उभा करणे ही स्व. अरविंदजी शहापूरकर यांची बलस्थाने होती’, असे सांगितले.