मध्यस्थीतून वाद निवारण लोकहित व समाजासाठी लाभादायक -आशुतोष करमरकर
वर्धा, दि.5 (जिमाका) : मध्यस्थी ही वाद निवारणाची परिणामकारक पध्दत आहे. न्यायवितरणासह वादनिवारण हेही न्यायालयाचे कर्तव्य असते. मध्यस्थीतून वाद निवारण लोकहित व समाजासाठी लाभकारक असून त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हाज व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आशुतोष करमरकर यांनी मध्यस्थी जनजागृती शिबिरात केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने विधी सेवा सदर येथे जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधिश -1 एन.बी शिंदे, जिल्हा व सत्र न्यायाधिश-4 जे.ए.पेडगावकर, कामगार न्यायाधिश एस.ए.देशपांडे, अधिवक्ता संघाचे उपाध्यक्ष ए.एन. ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.डी. देशमुख आदी उपस्थित होते.
पंचायतीच्या स्वरुपात मध्यस्थी प्रक्रिया पूर्वीपासून अस्तित्वात होती. न्यायाधीशांवर न्यायपूर्ण व तटस्थ अवलोकन करुन अशा शक्यतांचा शोध घेतला पाहिजे. त्या तपासून विवरणाचा सुवर्णमध्य गाठता येतो. दोन्ही पक्षांचे समाधान करणे गरजेचे असते. त्यासाठी मध्यस्थीतून वादनिवारणाचा आलेख उंचावण्यासाठी विचारमंथन व्हावे, असे प्रतिपादन श्री. पेडगावकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. डी. देशमुख यांनी व संचालन वरीष्ट स्तर 3 रे सह दिवाणी न्यायाधिश पी.टी. शेजवळ-काळे यांनी तर आभार 4 थ्या सह दिवाणी न्यायाधिश टी.ए.भोयर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधिश, प्रशिक्षित मध्यस्थी अधिवक्ता, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, इन्श्यूरंस कंपनीचे अधिकारी, कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, विधी स्वयंसेवक व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.