चिमुकल्यांचा तान्हा पोळा उत्साहात साजरा.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.
आपल्या कृषी प्रधान देशात बळीराजाचा खरा सोबती असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच पोळा असतो. त्याच्या पाडव्याला म्हणजेच दुसऱ्या दिवशी तान्हा पोळ्याचे आयोजन केल्या जाते. लहान मुलांमध्ये सुद्धा हे संस्कार बिंबावे म्हणून गावोगावीच नाही, तर शहरात सुद्धा या तान्ह्यापोळ्याचे आयोजन केल्या जाते.
जवळपास 217 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला हा तान्हा पोळा बैलपोळ्याप्रमाणेच साजरा केला जातो. यात लाकडांपासून तयार केलेल्या नंदी बैलांची लहानां करवी मिरवणूक काढल्या जाते. सायंकाळी ही चिमुकले आपल्या लाकडी नंदीला घेऊन आपापल्या शेजारील घरी जाऊन हक्काने "बोजारा" घेतात. शेजारी सुद्धा आनंदाने त्यांच्या लहानग्या नंद्याची पूजा करून त्यांना "बोजारा" देतात.
नागपूरातील पन्नासे लेआउटच्या शेवटच्या बस स्टॉप जवळ असलेल्या क्रीडा मैदानावर नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाद्वारे या लहानांच्या तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रत्येक बाल स्पर्धकास भेटवस्तू प्रदान करण्यात आल्यात. नंदी सजावट, वेशभूषा स्पर्धा तसेच प्रोत्साहन पर बाल स्पर्धकांना मान्यवरांद्वारे विशेष पारितोषिके देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन माधवराव गावंडे द्वारा केल्या गेले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.