कृतज्ञता, आभार अन् ओथंबलेल्या भावना
ना श्री. नितीन गडकरी यांना भेटून व्यक्त झाली गर्दी
नागपूर – कुणी म्हणाले, ‘साहेब, पेंशनचे काम झाले’, कुणी म्हणाले नोकरी लागली... तर कुणी अनेक वर्षांपासून खोळंबलेले प्रशासकीय काम झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हे चित्र होते केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमातील. कृतज्ञता, आभार अन् ओथंबलेल्या भावनांनी भारवलेले क्षण यंदाच्या जनसंपर्क कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
खामला येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळपासूनच गर्दी होती. गर्दीतील प्रत्येकाला व्यक्त व्हायचे होते. काहींच्या हाती मागण्यांची निवेदने होती तर काही लोक केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आले होते. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांच्या संदर्भातील मागण्यांची निवेदने ना. श्री. गडकरी यांनी स्वीकारली आणि त्याचवेळी ‘आपण पुढाकार घेतल्यामुळे काम झाले’ अशी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या नागरिकांच्या शुभेच्छाही त्यांनी स्वीकारल्या. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नेत्र व कर्ण दोष तपासणी शिबिराचा लाभ मिळत असल्याबद्दल काही ज्येष्ठ नागरिकांनी ना. श्री. गडकरी यांची भेट घेतली. त्याचवेळी अपघातात डोळ्याला झालेल्या दुखापतीच्या उपचारासाठी मदत करण्याची विनंती एका तरुणाने केली. त्यालाही ना. श्री. गडकरी यांनी विश्वास दिला. तर हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या एका तरुणीने शैक्षणिक मदत मिळावी म्हणून ना. श्री. गडकरी यांच्याकडे निवेदन दिले.
विविध विषयांची निवेदने
वैय्यक्तिक कामांसह प्रशासकीय कामांपर्यंत सर्व प्रकारच्या विषयांसाठी यावेळी निवेदने देण्यात आली. ना. श्री. गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दिव्यांग बांधव-भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणीचा विषय घेऊन आले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय ना. गडकरी यांनी ऐकून घेतले.