वर्धा जिल्ह्याकरीता हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा
नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा, दि. 13 : भारतीय हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी दि.14 व 16 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट असल्याचे दर्शविले असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच दि.15 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सद्या मान्सून कालावधीत जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस झालेला असून बहुतांशी प्रकल्प भरले आहेत. मुसळधार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील वर्धा, वना, बोर, पोथरा, यशोदा ईत्यादी नद्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तसेच सदर कालावधीत पोळा व तान्हा पोळा असून हे सण मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
वीजगर्जना होत असतांना शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास झाडाखाली उभे राहू नये. नदी व नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असेल तर धाडस करुन कुठल्याही प्रकारे पुल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. नदी तलाव व धरणे या ठिकाणी नागरिकांनी विशेषत: युवकांनी पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करु नये. कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करु नये. नदी धरणाकाठी वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यास वेळेत सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये. धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नये. घडलेल्या आपत्तीची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी, वेळोवेळी शासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या सचिव अर्चना मोरे यांनी कळविले आहे