मतदारांच्या मदतीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲप
वर्धा, दि. 1 : निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी व्होटर हेल्पलाईन अँप सुरु केले आहे. मतदारांच्या नाव नोंदणीसह नाव वगळने, दुरुस्ती करणे आदी बाबींसाठी या अँपचा उपयोग करावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा वर्धाचे उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांनी केले आहे.
व्होटर हेल्पलाईन ॲप हे गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यास त्यावर मतदार यादीतील नावाचा शोध घेणे, मतदार यादीत नाव नोंदणी करणे, दुरुस्ती करणे, नाव कमी करण्याची सुविधा, मतदान केंद्राची विस्तृत माहिती, निवडणूक विषयक चालू घडामोडी, निवडणूक निकाल व इतर विस्तृत माहिती उपलब्ध आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे ज्या नवमतदारांनी दि. 1 नोव्हेंबरच्या जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक्टोंबर या महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याआधी 18 वर्ष पुर्ण केली आहे. परंतु अद्याप मतदार म्हणून नोंदणी केलेली नाही, अशा वंचित नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यासाठी फॉर्म क्रमांक 6 भरुन मतदार यादीत नाव समाविष्ट करुन घ्यावे.
यादीतील नाव कमी करणे, हरकत नोंदविण्यासाठी फार्म क्रमांक 7 भरुन घ्यावा. ज्या मतदाराचे मतदार यादीतील नाव, वय, जन्म दिनांक व पत्ता, नातेवाईकाचे नाव इत्यादी माहितीत दुरुस्ती किंवा बदल करण्यासाठी फॉर्म क्रमांक 8 भरावा. सदर कामे ऑनलाईन स्वरुपात करावयाची असल्यास व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा, असे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.