महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा विभागाच्यावतीने प्रवाशांच्या सोईसाठी दिवाळी निमित्त एसटीच्या जादा फे-या उपलब्ध होणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा विभागाच्यावतीने प्रवाशांच्या सोईसाठी दिवाळी निमित्त एसटीच्या जादा फे-या उपलब्ध होणार
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757
वर्धा, दि. 8 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा विभागाच्यावतीने दिवाळी निमित्त दि.8 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत वर्धा पुणे, वर्धा औरंगाबाद, वर्धा तिरोडा व वर्धा नांदेड या मार्गावर बसच्या जादा फे-या सोडण्यात येणार आहे. जादा बसफेरींचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कालावधीत वर्धा पुणे ही बस दुपारी 6 वाजता व सायंकाळी 5.30 वाजता वर्धा येथून निघणार व पुलगाव, अमरावती, अकोला, चिखली, औरंगाबाद मार्गे पुणे येथे पोहोचणार असून सदर बसचे भाडे प्रौढांसाठी 1 हजार 555 रुपये व जेष्ठ नागरिकांसाठी 780 रुपये आकारण्यात येणार आहे. वर्धा तिरोडा ही बस वर्धा येथून सकाळी 7.30 वाजता सुटणार असून नागपूर, भंडारा मार्गे तिरोडा येथे पोहोचणार आहे. या बसचे भाडे प्रौढांसाठी 335 रुपये व जेष्ठ नागारिकांसाठी 170 रुपये आकारण्यात येणार आहे.
वर्धा नांदेड ही बस वर्धा येथून सकाळी 7 वाजता सुटणार असून वर्धा, यवतमाळ, आर्णी मार्गे नांदेड येथे पोहोचणार आहे. या बसचे भाडे प्रौढांसाठी 435 रुपये व जेष्ठ नागरिकांसाठी 220 रुपये आकारण्यात येणार आहे.
दिवाळीनिमीत्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जाणा-या व येणा-या समुहास एकत्रित थेट प्रवासाची सोय मिळावी याकरीता अँडव्हांस बुकींगची सोय विभागातील सर्वच बसस्थानकावरून करून देण्यात आलेली आहे.
जेष्ठ नागरीकांना देय असलेल्या तिकीट दराच्या सवलतीसह ॲडव्हांस बुकींग सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रवाशांनी या जादा बससेवेचा लाभ घेण्यासाठी आगार प्रमुख, बसस्थानक प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ग्रामिण भागातील प्रवाशांना आपआपल्या गावी अथवा ईच्छितस्थळी जाण्यासाठी दि.8 ते 30 नोव्हेंबर कालावधीत स्थानिक पातळीवर वर्धा बसस्थानकावरून नागपुर यवतमाळ, आर्वी बसस्थानकावरून अमरावती, वरूड, मोर्शी, हिंगणघाट बसस्थानकावरून चंद्रपुर, नागपुर, वर्धा, अमरावती, तळेगाव बसस्थानकावरून नागपुर, अमरावती, मोर्शी, वर्धा, वरुड, अमरावती मार्गे कु-हा, पुलगाव बसस्थानकावरून वरूड, चंद्रपुर, अमरावती, वर्धा अशा मार्गावर प्रवाशी गर्दी लक्षात घेता बसेसची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
नागरिकांनी आपला प्रवास कोणत्याही अवैध वाहनाने करू नये तसेच आरक्षणाकरीता महामंडळाच्या आरक्षण तिकीट केंद्र, ई-तिकीट योजनेचा लाभ घ्यावा, असे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.