सामान्य रुग्णालयात हिप रिप्लेसमेन्ट व गुडघा प्रत्यारोपनची यशस्वी शस्त्रक्रिया
*जन आरोग्य योजनेंतर्गत झाली शस्त्रक्रिया*
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757
वर्धा, दि. 9 : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सामान्य रुग्णालय डॉ.सतिश नगलवाडे यांनी त्यांच्या पथकाद्वारे विवेक कडूकर या रुग्णाची हिप रिप्लेसमेन्ट तर अविनाश मोहर्ले या रुग्णाच्या गुडघ्याच्या प्रत्यारोपनाची अवघड असलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.
महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत सदर शस्त्रक्रिया करण्यात आली. या योजनेंतर्गत रुग्णांना आरोग्य सेवेचा मोठा लाभ मिळत आहे. सामान्य रुग्णालयात अस्थिरोग विभागात भरती झालेल्या सावंगी मेघे येथील विवेक कडुकर व वर्धा येथील अविनाश मोहर्ले या रुग्णांचा सदर योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेनुसार शहरी व ग्रामीण कुंटूंबाच्या यादीत समावेश झालेला होता. त्यामुळे यायोजनेंतर्गत त्यांना लाभ देण्यात आला.
रुग्णालयात भरती झालेल्या दोन्ही रुग्णांची अस्थिरोग तज्ञ डॉ.सतिश नगलवाडे यांनी तपासणी व इतर आवश्यक तपासणी केली असता विवेक कडूकर या रुग्णाच्या कमरेच्या उजव्या बाजुचा हिप रिप्लेसमेन्ट करण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यानुसार शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले. अविनाश मोहर्ले यांना डाव्या पायाच्या गुडघ्याचा त्रास असल्याचे जाणवले असल्याने त्यांना गुडघा प्रत्यारोपन करण्याचे नियोजन करुन दोन्ही रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
दोन्ही शस्त्रक्रीया अवघड असल्याने 5 ते 6 तास सदर शस्त्रक्रीया चालली व रुग्णांना होणा-या त्रासापासुन मुक्त करण्यात आले. ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सचिन तडस तसेच ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे अधिकारी डॉ.प्रविण धाकटे यांच्या मार्गदर्शनात अस्थिरोग तज्ञ डॉ.सतिश नगलवाडे व डॉ.वैभव गिरडे यांनी केली. यासाठी भुलतज्ञ डॉ.प्रशांत बोंडे, डॉ.तेजस्विनी, डॉ.निखिल तसेच माधुरी शिरपुरकर, अमोल बुटले, पंकज वाघमारे, निलिमा पेटकर, प्रांजली दरडे, दिप तुरणकर, आकाश समुद्र, मनोज मुन इत्यादींनी सहकार्य केले. योजनेचे कर्मचारी सुकेशनी बारमाटे, सारंग भुंबरे, समीर डेकाटे यांनी यशस्वी करण्याकरीता प्रयत्न केले. असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.