“जलचर आधारित उपजीविकेच्या संधी” या विषयावर जलजीविका संस्थेची कार्यशाळा
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757
वर्धा :- जलजीविका हि एक नोंदणीकृत अशासकीय संस्था आहे जी लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आणि मत्स्य व्यवसायधारक यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दिशेने काम करते. जलजीविका संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलकंठ मिश्रा यांच्या संकल्पनेतून “जलचर आधारित उपजीविकेच्या संधी” या विषयावर सेवाग्राम येथील यात्री निवास येथे दिनांक २ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचा उद्देश उपजीविका क्षेत्रात विदर्भातील काम करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी यांना जलचर आधारित उपजीविकेच्या संधी विषयक जागरूकता निर्माण करणे, प्रदेशात विद्यमान जलसंचय, तंत्रज्ञान आणि इकोसिस्टम डेव्हलपमेंट मॉडेलच्या माध्यमातून उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, जलस्रोतांची उत्पादक क्षमता वाढवणे, ग्रामीण भागातील स्थलांतर कमी करणे आणि मत्स्यव्यवसाय मूल्य शृंखलेत उपजीविकेच्या संधींचे स्तर निर्माण करणे हा होता.
सदर कार्यशाळेला विदर्भातील वर्धा, अमरावती, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ अशा पाच जिल्ह्यातील उपजीविकेच्या संबंधित काम करणाऱ्या एकूण १३ संस्थांच्या ५५ प्रतिनिधिंनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेला श्री. पदमाकर बसवंत, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, वर्धा यांनी प्रामुख्याने हजेरी लावली आणि मत्स्यशेती करण्याचे महत्व व मत्स्य शेती अंतर्गत जलजीविका संस्थेनी केलेली तांत्रिक मदत तथा शेतकऱ्यात मत्स्यशेती विषयक जागरूकता निर्माण केल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. सत्राच्या प्रास्ताविक व कार्यशाळेचे महत्व श्री. समीर परवेज, मत्स्यव्यवसाय सल्लागार, जलजीविका यांनी सांगितले. प्रथम सत्रात कु. प्रियंका झोड, प्रशिक्षण समन्वयिका, जलजीविका यांनी गोड्या पाण्यातील मत्स्यशेती, गोड्या पाण्यातील संसाधनाचे महत्व, मत्स्यशेतिचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयांबद्दल माहिती दिली तर कु. अंकिता पाटील, प्रकल्प विकास अधिकारी, जलजीविका यांनी एकात्मिक मत्स्यशेती (कृषी आधारित मत्स्यपालन व पशूंसह मत्स्यपालन) या विषयावर संबोधित केले. या नंतर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेबद्दल श्री. समीर परवेज, मत्स्यव्यवसाय सल्लागार, जलजीविका यांनी सखोल माहिती दिली. दुपारच्या सत्रात बँक ऑफ इंडिया, वर्धाचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. चेतन शिरभाते यांनी मत्स्यव्यवसाय विभागासाठी उपलब्ध असलेल्या किसान क्रेडिट कार्ड या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या संस्थापैकी काही संस्था (एन.जी.ओ.) चे प्रतिनिधी यांनी सुद्धा मत व्यक्त केले. यात मुख्यत: श्री. किशोर जगताप (मिशन समृद्धी, वर्धा), श्रीमती. स्विटी मुनेश्वर (बायफ फाऊंडेशन, वर्धा), श्री. अनिल पेंदाम (नवनिर्माण संस्था, यवतमाळ), श्री. प्रकाश नवघरे (युवा रुरल असोसिएशन, नागपूर), श्री. अजय सहारे (एस. आर .टी.सी. गडचिरोली), श्री. स्वप्नील नागोसे (अॅक्शन अगेन्स्ट हंगर, अमरावती) इत्यादींनी त्यांच्या-त्यांच्या संस्थेची माहिती सांगितली व कार्यशाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या नंतर श्री. प्रसाद राजगुरू, विक्री आणि विपणन समन्वयक, जलजीविका यांनी मत्स्यव्यवसाय करताना उद्योजक विकास कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संस्थाना जोडण्याचे महत्वाचे कार्य श्री. गणेश तूळसकर, समुदाय विकास अधिकारी, जलजीविका व सोबतच श्री. सुहेल रामटेके, विभागीय मत्स्यव्यवसाय समन्वयक, जलजीविका यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. आरती पुसदकर, प्रशासन समन्वयक, जलजिविका व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. सुहेल रामटेके, विभागीय मत्स्यव्यवसाय समन्वयक, जलजीविका यांनी केले यांनी केले. सदर कार्यक्रम श्री. पदमाकर बोजा, प्रकल्प संचालक, जलजीविका यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला विशेष सहकार्य कु. दामीनी अखंड, श्रीमती. सुजाता बैस, कु. रेमा तावडे यांचे लाभले.