खासदार सांस्कृतिक महोत्सव- 2023
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.
केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 2017 पासून सुरू झालेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला सात वर्षे झाले असून यंदाचे हे महोत्सवाचे आठवे पर्व आहे.
24 नोव्हेंबर ते ५ डिसेंबर 2023 दरम्यान होऊ घातलेले हे भव्य आयोजन विविध धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा दोन सत्रात होत असून याकरिता हनुमान नगर, नागपूर येथील क्रीडा चौकालगत असलेल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात भव्य मंच उभारला जात आहे.
सलग बारा दिवसाचे भव्य आयोजन असलेल्या यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 ला सायंकाळी 06.30 वाजता बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे प्रेरक वक्ते, समाज सुधारक, डॉ. पुज्य ज्ञानवस्सल स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. तदनंतर संस्कार भारती नागपूर प्रस्तुत" महाराष्ट्र माझा" हा 900 कलाकारांचा सहभाग असलेल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक व लोकधारा दर्शविणारा नाट्य, नृत्य व संगीतमय असा अविष्कार सादर केला जाईल.
एअरपोर्ट, साउथ मेट्रो कन्व्हेन्शन हॉल, वर्धा रोड, नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेला माननीय, नितीनजी गडकरी यांनी प्रसार माध्यमांना संबोधले.
यावर्षी या महोत्सवानिमित्त शहरवासीयांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम कलाकारांच्या कलांचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. गायन, वादन, नृत्य, संगीत, नाट्य अशा सर्व कलांचा संगम असलेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवात 7 आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचा "लाईव्ह इन कॉन्सर्ट" होत असून गायक, संगीतकार, अभिनेते, पद्मश्री, अदनान सामी, सिंगर मिका सिंग तसेच पाच राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित गायिका, श्रेया घोषाल हे यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण राहणार आहेत. याशिवाय भोजपुरी सुपरस्टार, अक्षरा सिंग, गायक, बेनी दयाल, अभिनेते पियुष मिश्रा व संगीतकार जोडी सचिन- परंपरा यांचा "लाईव्ह इन कॉन्सर्ट" सुद्धा राहणार आहे.
सकाळच्या सत्रात होऊ घातलेल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये हनुमान चालीसा पठण, श्री रुद्र पठण, परित्राण पाठ, श्री सूक्त पठण, श्री हरिपाठ पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम पठण, गीता अध्याय पठण, श्री सुंदर कांड पठण, मनाचे श्लोक पठण, श्रीराम रक्षा स्तोत्र, श्री मारुती स्तोत्र यांचे सामूहिक पठण होणार आहे. याशिवाय तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य "क्रांती नायक"
गजानन महाराज यांच्या वरील महानाट्य "गण गण गणात बोते"
संविधान शिल्पकार महानाट्य तसेच नृत्य स्वरूप गीत रामायण सादर केले जाणार आहे.
नागपूर - विदर्भाची व मध्यम भारताची शान असलेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक, अनिल सोले यांनी यावेळी केले.