कारंजात ३०० वनराई बंधारे निर्मितीचा जिल्हाअधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारभ
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
जिल्हाधिकाऱ्यांचे श्रमदान वर्धा, : निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात कारंजा तालुक्याचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून तालुक्यात ३०० वनराई बंधारे तयार केले जात आहे. या बंधारे तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बंधारा तयार करण्यात सहभाग घेऊन श्रमदान केले.
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून कारंजा तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून ३०० वनराई बंधारे अभियान स्वरूपात लोकसहभागातून निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पनेनूसार जिल्हाधिकारी श्री.कर्डिले यांच्याहस्ते चोपण येथून वनराई बंधारे निर्मितीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ब्राम्हणवाडा व येणगाव येथे सुद्धा श्रमदानातून वनराई बंधारे तयार करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः श्रमदान केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकाऱ्यांनी वनराई बंधारेच्या माध्यमातून रब्बी पिकाकरिता संरक्षित ओलीत, पाणी पातळीत वाढ तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याकरिता सोय होणार असल्याचे सांगितले. गावकऱ्यांनी लोकसहभागातून अशाच प्रकारे सर्व गावात वनराई बंधारे निर्माण करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
या अभियान शुभारंभाप्रसंगी आर्वीचे उपविभागीय अधिकारी विशाल सिरसाट, कारंजा तहसीलदार ऐश्वर्या गिरी, गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, तालुका कृषि अधिकारी रमेश देशमुख, कृषि अधिकारी मंगेश पंधरे, तालुकास्तरीय सर्व अधिकारी, ज्यांच्या सहकार्याने वनराई बंधारे तयार करण्यात येत आहे ते सर्व ग्रामसेवक, ग्रामसेवक संघटना, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कारंजा तालुका निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असल्याने गारपीट येथे जनसंवाद कार्यक्रम घेऊन उपस्थित सरपंच, सचिव, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून तालुक्याच्या सर्वागीन विकासाकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गारपीट येथील दिव्यांग लाभार्थ्यांना 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीतून धनादेश वितरित करण्यात आले.