जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी वैशाली गजभिये-वाणे यांची नियुक्ती
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
वर्धा, दि. 12 :अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयान्वये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी वैशाली रमेशराव गजभिये-वाणे यांची नियुक्ती करण्यात आली असून संजय हरिराम मसंद व अनील रामनारायन तोष्णीवाल यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अध्यक्ष व सदस्यांनी आपल्या पदाचा दि.10 ऑक्टोबर रोजी पदभार स्विकारला असून आयोगाचे कामकाज नियमित होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी तथा अधिवक्ता यांनी प्रकरणे दाखल करावी, असे आवाहन प्रबंधक अमोल रामटेके यांनी केले आहे. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांचे कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांची स्वागत केले. यावेळी कार्यालय अधिक्षक श्री.पाटील, उच्चश्रेणी लघुलेखक श्री.बन्सोड, निम्नश्रेणी लघुलेखक श्री.कुंभारे, अभिलेखापाल श्रीमती लेंडे, कनिष्ठ लिपिक श्री. पांडे, श्री. उगले व श्री.थुल उपस्थित होते.
तसेच 20 ऑक्टोंबर रोजी सैनिक दरबारचे आयोजन
वर्धा जिल्ह्यातील सेवारत व माजी सैनिकांच्या तसेच त्यांच्या अवलंबितांच्या जिल्ह्यातील विविध विभागात प्रलंबित असलेल्या व वैयक्तिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी सैनिक दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. या सैनिक दरबारमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थित तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. त्यामुळे सेवारत व माजी सैनिक तसेच अवलंबितांना काही समस्या व अडचणी असल्यास कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि.20 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सैनिक दरबारमध्ये सेवारत व माजी सैनिक तसेच अवलंबितांना अडचणी किंवा समस्या असल्यास दि.17 ऑक्टोंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कागदपत्रासह दोन प्रति अर्ज सादर करुन टोकन प्राप्त करुन घ्यावे. तक्रारी वैयक्तिक स्वरुपाच्या असाव्यात. मागण्या करणारी प्रकरणे, मोघम स्वरुपाच्या तक्रारी तसेच न्यायप्रविष्ठ, न्यायालयात तसेच लोकशाही दिनात निकाली निघालेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही, असे जिल्हा सैनिक अधिकारी फ्ला. धनंजय सदाफळ यांनी कळविले आहे.