‘वंदन’ सन्मान सोहळ्यात वक्ते इंद्रजीत देशमुख यांचे प्रतिपादन सुचिता व श्रीकांत बनसोड यांना पुरस्कार प्रदान
सामाजिक कार्य मानवी संवदेनांचे प्रतिक
संवेदनांनी दुसऱ्यांसोबत स्वत:चेही जीवन समृद्ध होते
सामाजिक संवेदनांतून दुसऱ्यांसोबत स्वत:चेही जीवन समृद्ध होते
‘वंदन’ सन्मान सोहळ्यात वक्ते इंद्रजीत देशमुख यांचे प्रतिपादन
सुचिता व श्रीकांत बनसोड यांना पुरस्कार प्रदान
यवतमाळ – स्वत:चे दु:ख दूर सारताना इतरांच्याही वेदना जाणून घेत त्यांचे अश्रू पुसण्याचे काम संवेदनांतून होत असते. सामाजिक कार्य हे अशाच मानवी संवदेनांचे प्रतिक आहे. या संवेदना जपल्या तर दुसऱ्यांसोबत स्वत:चेही जीवन समृद्ध होते, असे प्रतिपादन शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान धारेवाडी येथील सुप्रसिद्ध वक्ते इंद्रजीत देशमुख यांनी येथे केले.
स्थानिक मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फॉउंडेशनच्या वतीने आयोजित ‘वंदन’ सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अविनाश सावजी, जीवनलाल राठी उपस्थित होते. यावेळी अकोला येथील एकविरा मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या सुचिता व श्रीकांत बनसोड या दाम्पत्यास राठी परिवारातील सदस्यांच्या वतीने प्रतिष्ठेचा 'वंदन' सन्मान देवून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, साडीचोळी, मानपत्र, स्मृतीचिन्ह व ५१ हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी बोलताना इंद्रजीत देशमुख म्हणाले, मागच्या पिढीने पुढील पिढीस काय दिले, हे फार महत्वाचे आहे. पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा सामाजिक जाणीवा आणि संवेदना ज्या पिढीला आधीच्या पिढीकडून मिळतात, तीच पिढी समाजाचे जीवनमान उंचावू शकते. सुचिता आणि श्रीकांत बन्सोड हे दाम्पत्य स्वत:चे कर्णबधीर मुल वाढविताना, त्याला शिकवताना समाजातील अशा इतरही मुलांसाठी काम करत आहे, ही खरी संवेदना होय. अशा संवदेनशील लोकांमुळेच समाजात खुप काही चांगलं काम सुरू आहे, असे देशमुख म्हणाले. दुसऱ्यांचे जीवन समृद्ध करता करता, जो आपले जगणे समृद्ध करतो, त्याला आयुष्य कळले. निसर्गाने मनुष्याला दिलेल्या सामर्थ्याचा उपयोग समाजासाठी करावा. ज्यांना जगण्याचे प्रयोजन कळले, त्यांचे आयुष्य सुंदर होते, असे देशमुख यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सुचिता बनसोड यांनी येथून पुढील कामासाठी खूप सारी प्रेरणा घेऊन जात असल्याचे सांगितले. कुटुंबाच्या सहकार्याने हे सामाजिक काम सुरू केले होते. ते आता आमचे राहिले नसून सर्वांचे झाले आहे. वंदन पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढली असे सांगून पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. माणूस मोठा झाली की, अहंकार येतो. मात्र अहंकार बाजूला सारून समाजासाठी जे लोक जगतात, तेच खऱ्या अर्थाने मोठे होतात. त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक दातृत्व जपले पाहिजे, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात राधेशाम चांडक यांनी केले. यावेळी ‘संकल्प’ फाऊंडेशनच्या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी सुचिता व श्रीकांत बनसोड यांच्या कार्यावर आधारित निखील परोपटे यांनी लिहिलेली व आनंद कसंबे यांनी तयार केलेली चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी उपस्थिांपैकी अनेकांनी बनसोड दाम्पत्यास सढळ हस्ते मदत निधी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश सावजी यांनी केले. संचालन कमल बागडी यांनी तर आभार सुरेश राठी यांनी मानले. कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.