जिल्ह्यातील ८ ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्र्यांहस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन
जिल्ह्यातील आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
वर्धा, दि.19 : ग्रामीण भागातील तरुणांना ग्रामीण स्तरावरच कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने देशभर प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र उभारले जात आहे. जिल्ह्यातील ८ केंद्रांसह राज्यातील ५११ केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे झाले.
उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती होती. तर जिल्ह्यातील पवनार येथील केंद्रावर आ.डॉ.पंकज भोयर, गटविकास अधिकारी, जिल्हा कौशल्य रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड, तहसिलदार रमेश कोळपे उपस्थित होते.
कारंजा तालुक्यातील ठाणेगाव केंद्रावर आ.दादाराव केचे, तहसिलदार, गटविकास अधिकारी सेलू तालुक्यातील कान्हापूर येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह तहसिलदार व तालुकास्तरीय अधिकारी, आष्टी तालुक्यातील तळेगाव केंद्रावर अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, आर्वी तालुक्यातील रोहणा केंद्रावर उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखडे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे उपविभागीय अधिकारी विरेंद्र जाधव उपस्थित होते.
हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, व देवळी तालुक्यातील नाचनगाव येथे संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. या केंद्राच्यामाध्यमातून ८ गावांसह आजूबाजूच्या गावातील तरुण-तरुणींना अल्पमुदतीचे मोफत अनिवासी कौशल्य विकास प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. जिल्ह्यात आठही केंद्रावर दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले.