हिंगणघाट तहसीलदाराची रेती तस्करांवर धडक कारवाई
तहसिलमध्ये दोन ट्रॅक्टर केले जमा ट्रॅक्टर मालकांना 2.46 लाखाचा दंड
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
वर्धा, दि. 11: हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मासाळ व नायब तहसीलदार सागर कांबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा पारडी येथील रेती घाटावर धाड टाकून रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर धडक कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर जमा करण्यात आले असून मालकांवर दंड आकारण्यात आले आहे.
हिंगणघाट तहसीलदार सतिश मासाळ यांना रेतीचे अवैध उत्खनन करुन ट्रॅक्टरद्वारे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदारांनी धडक कारवाईचे नियोजन केले. कारवाई पथक रेतीघाट परिसरात पोहोचल्यानंतर अवैधपणे रेतीचे उत्खनन करुन रेतीची वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर आढळून आले. तहसील कार्यालयामध्ये हे दोनही ट्रॅक्टर जमा करण्यात आले आहे.
ट्रॅक्टर मालकांची नावे मनोज सायंकार व सोनू गवळी अशी आहे. या ट्रॅक्टर मालकांकडून प्रत्येकी 1 लक्ष 23 हजार 100 रुपये असा एकूण 2 लक्ष 46 हजार 200 रुपये इतका दंड आकारण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार श्री. मासाळ यांनी दिली.
रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक गुन्हा असून याविरोधात कारवाई केली जात आहे. त्यासाठी तालुक्यात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांना असे उत्खनन व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.