आष्टी व कारंजा ग्रामीण रुग्णालयाची महसूल अधिकाऱ्यांकडून पाहणी
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
वर्धा, दि. 10 : रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्या, रुग्णालयांमधील सोई, सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची पाहणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आष्टी व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयांची महसूल अधिकाऱ्यांद्वारे भेट देऊन पाहणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार आर्वीचे उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट यांनी कारंजा ग्रामीण रुग्णालयाची तर आष्टीचे तहसीलदार सचिन कुमावत यांनी आष्टी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी बाह्य कक्ष विभाग, आंतर कक्ष विभाग, प्रसूती विभाग, अपघात विभाग, अस्थिरोग विभाग, एक्सरे विभाग आदींची तपासणी केली. तसेच नवजात शिशु तपासणी सुविधा, फायर ऑडिट करणे बाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या. यावेळी कारंजा तहसीलदार ऐश्वर्या गिरी, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्नाके यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालय, आष्टी येथे तहसीलदार सचिन कुमावत यांनी भेट दिली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पराडकर आणि इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बाह्यरुग्ण विभाग, औषधांचा साठा, नेत्र विभाग, पुरुष आणि स्त्री वार्ड या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांची चार पदे मंजूर असून सद्या फक्त एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णांना सेवा पुरवताना अडचण होत असल्याचे डॉक्टर पराडकर यांनी यावेळी सांगितले. यासाठी आरबीएसचे इतर तीन डॉक्टर यांची सेवा त्यांनी ग्रामीण रुग्णालयात घेतल्याचे नमूद केले. तसेच एक्स-रे टेक्निशियन हे पद 30 सप्टेंबर रोजी रिक्त झाल्याने त्याबाबत देखील वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याबाबत सांगितले.
औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. बाह्य रुग्ण विभाग येथील रुग्णांची नोंदणी अजून चांगल्या ठिकाणी करण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहतील त्याअनुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना डॉ. पराडकर यांना देण्यात आल्या.