लाखो अनुयायांनी घेतला संकल्पच्या निशुल्क भोजनाचा लाभ
माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात संकल्प सेवाभावी संस्थेचा उपक्रम
नागपूर, दिनांक २४/१०/२०२३ :- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात गत ३७ वर्षांपासून पवित्र दीक्षाभूमी येथे “संकल्प” सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो अनुयायांकरिता भोजन वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. २३ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर पर्यंत अविरत अनुयायांना भोजनाचे वितरण करण्यात येणार आहे. “संकल्प” च्या भोजनदानाचे सोमवारला माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते सुरुवात झाली.
विषमतेच्या मुळांना उखडून फेकून माणुसकीची नवी फुलबाग फुलवणारा क्षण म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन होय. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक अशा रक्तविहीन धम्मक्रांतीचा जयघोष केला आणि अंधारात चाचपडणाऱ्या लाखो अस्पृश्यांना बुद्धाचा तेजस्वी प्रकाश दाखविला.
संपूर्ण देशातून दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांना भोजनदानाने “संकल्प” च्या उपक्रमाची दरवर्षी प्रमाणे सुरुवात झाली. यावर्षी ही लाखो अनुयायांना “संकल्प” च्या माध्यमातून अविरत तीन दिवस भोजनदान करण्यात येणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
“संकल्प” ही नोंदणीकृत सामाजिक संस्था मागील ३७ वर्षापासून दलित, शोषित, मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी अनेक विभिन्न कार्यक्रम सतत राबवित आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, आर्थिक समतेचे व आमुलाग्र परिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी ही संघटना सातत्याने झटत आहे. तसेच सन १९८७ पासून “संकल्प” संस्थेव्दारे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास देशाच्या विविध प्रांतातुन तसेच महाराष्ट्राच्या वेग-वेगळया जिल्हातून तसेच गाव खेड्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना दरवर्षी सतत ३ दिवस उत्तम भोजन उपलब्ध करुन देण्यात येते. सोबतच संकल्पच्या कार्यलयात मदत केंद्र आणि अनुयायांच्या निवासा करिता निवासी केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रसंगी संकल्प सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राजा करवाडे, अनिल नगरारे, अशोक हुमणे, कुणाल राऊत, विनय सहारे, शशी रायपुरे, किशोर टेम्भूरकर, विभूती कश्यप, साहेबराव सिरसाट, विनोद शेंडे, सुनील फुलझेले, सतीश माटे प्रामुख्याने उपस्थित होते.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद डॉ. नितीन राऊतांच्या भेटीला
आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद दिक्षाभूमी येथे अभिवादन करण्याकरिता आले असता त्यांनी संकल्पच्या कार्यालयात राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी भेट घेतली. यावेळी संकल्प मार्फत राबविण्यात आलेल्या भोजनदान आणि संकल्पच्या इतर उपक्रमाची माहिती डॉ. राऊत यांनी चंद्रशेखर यांना दिली.