'वॉक फॉर फ्रीडम' पदयात्रेचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्याहस्ते शुभारंभ
यात्रेत सहभागींनी मानवी तस्करी विरोधात केली जनजागृती
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
वर्धा, दि.19 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि व्हिजन रेस्क्यू यांच्या संयुक्त विद्यमाने मानव तस्करीच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता वॉक फॉर फ्रीडम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आशुतोष करमकर यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
यशवंत महाविद्यालय येथून मानव तस्करीच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता वॉक फॉर फ्रीडम पदयात्रेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा न्यायाधीश-१ एन.बी.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर.जे.राय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.डी.देशमुख, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष के.पी. लोहवे तसेच यशवंत महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.बेले उपस्थित होते.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी पदयात्रेचा हेतू, त्याची गरज याबद्दल पदयात्रेतील उपस्थितांना मार्गदर्शन केले. वॉक फॉर फ्रीडम पदयात्रेची प्रतिज्ञा व स्वातंत्र्याची घोषणा तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 आर.जे.राय यांनी दिली. ही मूकपदयात्रा यशवंत कॉलेजपासून सुरु होऊन गांधी पुतळा, आंबेडकर पुतळा व जिल्हा परिषद मार्गे पदयात्रेचा समारोप झाला.
या पदयात्रेत सहभागी प्रतिनिधींनी देशात वाढलेली महिलांची होणारी तस्करी या विरोधात आपण एकत्र येऊन ठोस पावले उचलली पाहिजे. याबाबत एकत्र येऊन लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असा इशारा या पदयात्रेतून देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिमांशू लोहकरे यांनी केले. संचलन विधी स्वयंसेवक व विधी शाखेची विद्यार्थीनी अनुराधा देशमुख यांनी केले तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.डी.देशमुख यांनी मानले.