सीधे मुख्य सामग्री पर जाएं

कान्हापूर येथील अमृत कलश यात्रेत बालकांचा सहभाग / मेरी माटी मेरा देश अभियान

 कान्हापूर येथील अमृत कलश यात्रेत बालकांचा सहभाग / मेरी माटी मेरा देश अभियान

🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा, दि.18: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा काढली जात आहे. सेलू तालुक्यातील कान्हापूर येथे आयोजित या यात्रेत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. घराघरातून माती गोळा करण्यात आली.

जिल्ह्यात दि. 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गावात अमृत कलेश यात्रेचे आयोजन करून मातीचे संकलन करण्यात येत आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात माझी माती माझा देश अभियान अंतर्गत सेलू तालुक्यातील ग्रामपंचायत कान्हापूर येथे कलश यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत शाळेतील मुलांसह शिक्षक, गावकरी व जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अभियानाच्या नोडल अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, गावच्या सरपंच रेखा महाकाळकर उपस्थित होत्या.

यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुले तसेच नागरिकांनी पंचप्रण शपथ घेतली. सायंकाळी गावात कलश व मशाल फेरी काढून मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान अंतर्गत उपक्रमाचे नागरिकांना महत्व समजावून सांगण्यात आले. गावातील प्रत्येक घरातून माती गोळा करून माती कलश व मशाल फेरी पूर्ण करण्यात आली.

या उपक्रमात गावातील नागरिक, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशाताई तसेच ग्रामपंचायत सदस्य, सचिव चंद्रकांत वघळे व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अभियानांतर्गत प्रत्येक गावातून माती गोळा केली जाणार असून मातीचा कलश तालुकास्तरावर व तेथून जिल्हास्तरावर पोहोचविला जाणार असल्याचे डॉ. ज्ञानदा फणसे यांनी सांगितले.